Monday 12 March 2018

रामसर करार



  • दलदलीय परिसंस्थांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला म्हणजेच रामसर करार होय.
  • इराणमधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ मध्ये हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला आणि १९७५ पासून हा अमलात आला. 
  • या ठरावात १९८२ तसेच १९८७ साली सुधारणा करण्यात आल्या आहेत. 
  • संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने सुद्धा हा करार स्वीकारला आहे.

उद्देश

स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.

पाणथळ जागा म्हणजे काय..?

  • पाणथळ जागा अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था असतात. त्यांच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. 
  • पण पाणथळ जागांचा दर्जा सातत्याने घसरत आहे आणि त्यांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे. 
  • या ठरावामध्ये पाणथळ जागांची विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, खारफुटी वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इ.चा तसेच मत्स्य संवर्धनासाठीची तळी, भात शेती, पाणी साठे आणि मिठागरे या मानवनिर्मित ठिकाणांचा सुद्धा समावेश होतो.

रामसर करारातील देशांसाठी पुढील गोष्टी करणे अपेक्षित आहे.


  1. आपल्या देशातील पाणथळ जागांचा विवेकी वापर.
  2. आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या यादीत म्हणजेच रामसर स्थळांमध्ये आपल्या देशातील योग्य स्थळांचा समावेश करणे.
  3. दोन देशातील सामायिक पाणथळ जागा, पाणथळ परिसंस्था आणि प्रजाती यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करणे.

भारतातील रामसर स्थळे

१ फेब्रुवारी १९८२ मध्ये भारताने या ठरावावर कार्यवाही केली.

भारतातील पुढील पाणथळ जागांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत आहे :--

  • जम्मू आणि काश्मिर :- होकेरा. 
  • त्रिपुरा :- रुद्रसागर तलाव. 
  • राजस्थान :- सांभार तलाव. 
  • मणिपूर :- लोकटक तलाव. 
  • पंजाब :- हरीके तलाव. 
  • जम्मू आणि काश्मिर :- वूलर सरोवर, सुरीन्सर, मानसर तलाव. 
  • ओरिसा :- चिल्का सरोवर. 
  • आसाम :- दीपोर बील. 
  • राजस्थान :- केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 
  • पंजाब :- रोपर,  कंजली. 
  • केरळ :- वेंबनाद कोल, सास्थमकोट्टा, अष्टमुडी. 
  • हिमाचल प्रदेश :- पोंग डॅम तलाव, चंद्रताल, रेणुका अभयारण्य. 
  • ओरिसा :- भितरकनिका राष्ट्रीय उद्यान. 
  • तामिळनाडू :- पॉइंट कॅलीमेर वन्य जीव आणि पक्षी अभयारण्य. 
  • आंध्र प्रदेश :- कोल्लेरू तलाव. 
  • पश्चिम बंगाल :- पूर्व कलकत्ता पाणथळ जागा. 
  • मध्य प्रदेश :- भोज पाणथळ जागा. 
  • गुजरात :- नलसरोवर पक्षी अभयारण्य. 
  • उत्तर प्रदेश :- गंगा नदीचा वरचा भाग: ब्रिजघाट ते नरोरा.

  • भारतात २६ रामसर पाणवठे आहेत. मात्र, कराराला ४६ वर्षे होऊनही महाराष्ट्रातील एकाही पाणवठ्याला दर्जा मिळालेला नाही.

राज्यातील संभाव्य रामसर जागा :-

  • २००८ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा प्रकाशित ‘पोटेंशिअल अँड एक्झििस्टग रामसर साइट्स इन इंडिया’ या ग्रंथात जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड), माहूल शिवडीची खाडी (मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई) या पाणथळ जागांचा समावेश होता, पण त्यानंतर पक्षिमित्रांची संख्या वाढली व अनेक पाणथळींवर आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. 
  • आता पुन्हा एकदा आपण रामसर निकषांचा विचार केला तर उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया), लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या स्थळांचासुद्धा संभाव्य स्थळांच्या यादीत समावेश होतो. 
  • विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी :- www.reliableacademy.com